अभ्यंकरांचे कुळाचार

प्रत्येक कुळात पिढ्यान् पिढ्या निरनिराळे कुलधर्म व कुळाचार पाळले जातात. पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरांचे पालन आजवर लोक करीत आले आहेत. परंतु आधुनिक काळात या परंपरांचा झपाट्याने लोप होत चालला आहे. या कुलाचारपालनामुळे आपला कुलस्वामी, आपली कुलदेवता, आपली ग्रामदैवते यांचे स्मरण होते; आपला मूळ गाव आठवतो. आपल्या कुलातील मंडळींचे स्थलांतर केव्हा, कोठे, कसे होत गेले याचाही बोध होतो. या सर्व आठवणी जागृत ठेवणे हा सुद्धा या कुलाचाराचा हेतू आहे. भावी पिढ्यांतील स्त्री पुरुषांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने बोडण, महालक्ष्मीपूजन, आणि देवदिवाळी या खास चित्पावन ब्राह्मण कुलात पाळल्या जाणा-या कुलाचारांची माहिती येथे देत आहोत. सदर लेख गाडगीळ कुलवृत्तांतामधून घेतला आहे.

देवदिवाळी- मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी असे नाव आहे. मासानां मार्गशीर्षोहम् . असे भगवान श्रीकृष्णांनी गीता अध्याय 10.35 मध्ये सांगितले आहे. सर्व महिन्यांत मार्गशीर्ष हा महिना श्रेष्ठ . त्याला विष्णुमास असेही नाव आहे. प्राचीन काळी मार्गशीर्ष मासाने वर्षारंभ होत असे. चित्तपावन ब्राह्मणांखेरीज मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेचे महत्व अन्य कोणीही मानीत नाहीत.

या दिवशी सर्व चित्तपावन ब्राह्मण कुटुंबांतून आपला कुलस्वामी, कुलदेवता व ग्रामदेवता यांना महानैवेद्य अर्पण करण्याचा कुलाचार पाळला जातो. त्याला नैवेद्य घालणे असेही म्हणतात. यावेळी मुख्य देवतांचे नैवेद्य स्वतंत्र पानावर व ग्रामदेवतांचे नैवेद्य त्यांच्या संख्येइतक्या भाताच्या मुदा व पक्वान्ने एका पानावर या प्रमाणे मांडतात. वडे-घारगे(भोपळ्याचे गोड वडे) हे मुख्य पक्वान्न या वेळी करतात.

सर्व देवतांना एकाच वेळी नैवेद्य दाखविण्यात येतो. कुलदेवतेचा नैवेद्य घरातील मंडळी सेवन करतात. इतर ग्रामदेवतांचे नैवेद्य बहुधा गाईला घालतात किंवा गुरवाला अथवा गोरगरिबांना देतात. देवदिवाळीला हे जमले नाही तर पुढे चंपाषष्ठीपर्यंत सोयीच्या अशा कोणत्याही दिवशी नैवेद्य घालावेत.