अभ्यंकर कोण ?

अभ्यंकर हे वासिष्ठगोत्रिय चित्तपावन कोंकणस्थ ब्राह्मण. अभ्यंग म्हणजे मखणे, उटी-तेल लावणे. ब्रह्ममुहूर्ती अभ्यंग स्नान करणारे ते अभ्यंकर. अभयंकर वा अभ्यंकर असाही एक विचार प्रवाह आहे. आश्रयाला येणा-या व्यक्तींना वा शरणागतांना अभय देणारे अभ्यंकर होत. असे अभय सत्ताधारी व्यक्ती देऊ शकते. अभ्यंकर सत्ताधीश असल्याचे इतिहास सांगत नाही. मात्र ब्रह्मविद्येने आत्मसाक्षात्कार अनुभवलेली व्यक्ती असे अभय देण्यास समर्थ असते.

विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या मते अभ्यंकर हे उपनाम अभ्यन्तर वरुन आले आहे. अभ्यन्तर हे संस्कृत भाषेतील विशेषण आहे. त्याचे दोन प्रमुख अर्थ आहेत. पहिला अर्थ सलगीचा, जवळकीचा स्नेही असा आहे. दुसरा अर्थ अधिक मोलाचा आहे. अभ्यन्तर म्हणजे निष्णात. अर्थात वेदविद्येत व आपल्या कर्मात निष्णात ते अभ्यन्तर होत. अभ्यंकर प्रामुख्याने ज्ञानोपासक असल्याने वेदविद्येतील निष्णात म्हणूनच त्यांची परंपरेने ख्याती असली पाहिजे. स्थलपरत्वे, कालपरत्वे अभ्यंकर कुळातील काहीजण अन्य व्यवसायात गेले आणि खोत अभ्यंकर वा ज्योतिषी अभ्यंकर वा सावकार अभ्यंकर अशीही घराणी निर्माण झाली. परन्तु व्यवसायातील कर्मकुशलता मात्र राहिली. अभ्यन्तर(अभ्यंकर) मधील त चा क कालाच्या ओघात झाला असावा.