मालवण हे शहर सिंधुदुर्ग जिल्ह्यात (पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यात) तालुक्याच्या ठिकाणी असून जवळच समुद्रात इतिहास प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला असल्यामुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मुंबई आणि रत्नगिरी येथून थेट एस.टी. बसगाड्यांची सोय आहे. पूर्वीचा आगबोटीचा मार्ग सध्या बंद आहे. मालवण येथे देऊळवाडख्झ्र् या भागात शिवकालापूर्वीपासून अभ्यंकर कुटुंबाची वस्ती होती असे दिसते. कारण श्री ब. मो. पुरंदरेकृत शिवचरित्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी समारंभासाठी तेथील जानंभट व दादंभट यांना बोलविले असता त्यांनी मुसलमानांच्या भीतीमुळे शिवाजी महाराजांना नकार दिला होता. परन्तु त्याबद्दल महाराजांनी अभय आणि संरक्षण दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पायाभरणी समारंभाचे पौरोहित्य केल्याचा उल्लेख आला आहे. तथापि तेथील अभ्यंकर कुटुंबीय कुठून इथे वस्तीस आले त्यासंबंधीचा निश्चित पुरावा सापडला नाही. परन्तु ते गुहागर किंवा कुर्धे इ. उत्तरेकऊन खाली मालवण येथे आले असावेत असे म्हणतात. सध्या मालवण देऊळवाडा येथे अभ्यंकरांची सहा घरे असून त्यांत अभ्यंकर कुटुंबीय वस्ती करुन आहेत. मालवण येथील श्री कृष्ण गोपाळ अभ्यंकर यांचेकडून माहिती मिळाली त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवाजीचे देऊळ बांधलेले आहे. त्याची दररोज पूजा करणे व नैवेद्य दाखविणे इ. चे अधिकार त्यांचेकडे आहेत.त्याकरिता पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानाकडून देणगी रु. 1000/- मेहनतनामा म्हणून मिळत होती व ती अद्यापही चालू आहे. देऊळवाडा येथील श्री नारायण,रामेश्वर, आणि सातेरी देवी यांच्या पालखीस खांदे देण्यासाठीचा अधिकार त्यांचे घराण्याकडे आहे. त्यानुसार द्यावयाचे 80/- रुपये प्रतिवर्षाप्रमाणे ते देत आहेत. मालवण येथील धुरीवाडा ते वायरी पर्यंत (नगरपालिकेच्या हद्दीत) भिक्षुकी करण्याचा अधिकार पूर्वीपासून त्यांचे घराणेकडे चालत आलेला आहे. त्या हद्दीबाहेर भिक्षुकी करण्याचा अधिकार त्यांचे चुलत बंधू श्री केशव विष्णु अभ्यंकर यांचे घराण्याकडे आहे. हे सर्व अधिकार शिवाजी महाराजांनी दिलेल्या तांम्रपटानुसार होते. परन्तु 1928 साली खेर मंत्रीमंडळ आल्यावर माननीय लठ्ठेसाहेब यांच्या कमिशनने अभ्यंकरांकडील हे अधिकार रद्द केले व लोकांनी त्यांचे इच्छेनुसार कोणाही ब्राह्मणास आपल्या घरी याज्ञिकी करण्यासाठी बोलवावे असा निकाल दिला. शिवाजीची पूजा आणि देवांची पालखी याकरिता अभ्यंकर घराण्यास बरीच जमीन (शेती व वरकस) दिलेली होती. त्यापैकी आता अगदी थोडीच जमीन त्यांचे घराण्याकडे अजूनही आहे. सोयीसाठी मालवण येथील दोन घराणी दाखवली आहे- 1) जानंभट्ट घराणे 2) कृष्णंभट घराणे