राजापूर हे शहर रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. ते मुंबई गोवा महामार्गावर मुंबईपासून 400 कि.मी. अंतरावर आहे. रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 76 कि.मी. अंतरावर आहे. राजापूर हे इतिहास प्रसिद्ध व्यापारी शहर आहे. इथे पूर्वी इंग्रजी व फ्रेंच वखारी होत्या, तसेच पोर्तुगीजांचीही वखार होती. या वखारीची इमारत अजूनही तेथे जीर्णावस्थेत उभी आहे. या शहराजवळून अर्जुना नदी वाहते. त्याशिवाय दुसरीही एक नदी-गोडी नदी राजापूर शहरातून वाहते. या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. त्या दृष्टीने राजापूर हे संगमावर वसलेले शहर आहे. पूर्वी राजापूर खाडीतून म्हणजे अर्जूना नदीतून व पुढे समुद्रमार्गे मोठा व्यापार चालत असे.
देशावरील(घाटावरील)हळद वगैरे माल राजापूरला येऊन खाडीमार्गे व समुद्रमार्गे पुढे जात असे. त्यामुळे अजूनही चांगल्या हळदीला व चांगल्या खोब-याला राजापूरी हळ्द, राजापूरी खोबरे असा शब्दप्रयोग वापरला जातो. राजापूरी पंचेहि प्रसिद्ध आहेत. परंतु राजापूरमध्ये हातमाग नाहीत. कदाचित फार पूर्वी असावेत. पण त्यासंबंधी माहिती उपलब्ध नाही. शिवाजी महाराजानीही या शहराला भेट दिल्याचा इतिहासांत उल्लेख आहे.
येथूनच जवळच उन्हाळे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. तेथे नगरपालिकेतर्फे स्नानाकरीता कठडे वगैरे बांधून पुरुष व स्त्रियांकरिता वेगवेगळी व्यवस्था केली आहे.
उन्हाळे येथून डोंगर चढून गेल्यावर डोंगर माथ्यावर सप्रसिद्ध गंगातीर्थ आहे. गंगातीर्थ येथे काळ्या दगडाने पक्की चौदा कुंडे बांधलेली आहेत. मूळ कुंड वडाचे बुध्यापाशी असून तेथून गंगा प्रवाह सुरु होतो. चौदा कुंडातून फिरल्यानंतर गोमुखातून गंगाप्रवाह बाहेर पडतो. साधारणपणे तीनचार वर्षांनी गंगा अवतीर्ण होते. मध्यंतरी 10/15 वर्षे खंड पडला होता. गंगा आल्यावर इथे फार मोठी यात्रा भरते.
राजापूर येथून जवळ श्री धूतपापेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.हे मंदिर व मंदिराचा परिसर फार प्रेक्षणीय आहे.
पुर्वी उन्हाळे, गंगा, धूतपापेश्वर या ठिकाणी पायी जावे लागत असे. आता बस व रिक्शाने जाता येते.
अर्जूना नदिपलिकडे कोंढे (कोंढ्याची तड) हे गाव आहे. येथे अभ्यंकरानी येऊन वस्ती केली. या मुळगावाहून चरितार्थासाठी बरेच बंधू बाहेर गेले. व तेथेच स्थायिक झाले त्या सर्वांकडून आलेल्या माहितीनुसार तीन घराणी दाखवली आहेत. ती अशी-
1) राजापूर-कोंढे घराणे
2) राजापूर-कोंढे-डहाणू (दत्तक घराणे)
3) राजापूर-कोंढे-लिंबगोवा-अकोला घराणे
या शिवाय आडिवरे, राजापूर येथूनहि कांही अभ्यंकरांची माहिती आली आहे. परंतु त्याची जोडणी वरील अभ्यंकर घराण्याशी करता आली नाही. त्यामुळे ती माहिती कुलवृत्तांतात वेगळी घराणे क्र. 4 म्हणून दाखवली आहे.
कुलधर्म व कुळाचार- या घराण्यातील कुटुंबात खालील कुळाचार पाळले जातात.1) बोडण- साधारणतः प्रत्येक कुटुंबात वर्षातून एकदा बोडण घातले जाते. तसेच काही मंगलकार्य झाल्यावर बोडण घालण्याची पद्धत आहे.
2) गोंधळ- लग्न, मुंज वगैरे मंगलकार्य झाल्यानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
3)महालक्ष्मी- आश्विन शुद्ध अष्टमीस श्री महालक्ष्मीचीपूजा करुन रात्री घाघरी फुंकून जागविण्याची प्रथा आहे. नववधूचे पहिल्या पांच वर्षात अशी प्रथा करण्याची पद्धत आहे.