केळे हे गांव रत्नागिरीपासून 8 मैलांवर व मजगाव पासून 2 मैलावर असून रत्नागिरी येथून मजगांव पर्यंत एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. मजगांव पासून पुढे पुलाचे पलीकडे 2 मैल चालत जावे लागते. तेथे 12 वाड्यांपैकी केळे-आंबे कोडी येथे अभ्यंकरांची तीन घरे अस्तित्वात आहेत. परन्तु त्यापैकी खालील दोन घरांतच कुटुंबाचे वास्तव्य असून तिसरे घर अभ्यंकरांची नात सहस्त्रबुद्धे यांचेकडे आहे.
1) श्री गणेश दत्तात्रय अभ्यंकर व श्री वासुदेव दत्तात्रय अभ्यंकर
2) श्री गजानन रामचंद्र अभ्यंकर व आई श्रीमती सीताबाई रामचंद्र अभ्यंकर (श्री गजानन रामचंद्र अभ्यंकर त्यांची पत्नी व दोनही मुले मुकी आहेत)
या गावची लोकसंख्या अंदाजे 2500 ते 3000 असून केळकर, सहस्त्रबुद्धे, बापट, गोखले, साठे, लिमये, बेहेरे इ. ब्राह्मणांची 20-25 घरे आहेत. मराठी 7वी पर्यंत प्राथमिक शाळा असून गावात नारळी, पोफळी, आंबा, फणस, काजू इ. ची लागवड व भातशेतीही आहे. लक्ष्मी नारायण, गणपती पंचायतन, काशी विश्वेश्वर,नवलाई, पावणाई, वाघजाई इ.ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. नागूकाका अभ्यंकरांचे घराण्यात पूर्वी पाच पिढ्या अग्निहोत्र होते. परन्तु हल्ली चालू दोन पिढ्यांत ते चालूनाही. त्यांचेच मालकीच्या जमिनीतून स्वयंभू पाण्याचा झरा असून त्याची पाणी बारामाही इतरांसाठी मिळते. केळे व मजगांव ही दोन गावे जोडगावे असल्यामुळे त्याला केळे-मजगांव असे संबोधतात.
केळे-मजगांव या गावी प्रथम वस्तीस आलेला पुरुष हा कुर्धे येथून इ.स. 1700 पूर्वी आला असावा असा पुरावा नारायण रावजी भानोशे आणि घोंडो गोविंद दाते(पुरोहित) यांचे वहीतील उता-यावरुन आढळतो. या पुरोहितांच्या वहीतील जुन्या वंशावळीशी आपले मुळ्गांव केळे मजगांव आहे असे सांगणा-या व्यक्तिंनी दिलेली माहिती पडताळून त्यांतील स्थलांतरानुसार त्यांच्या वंशावळी व त्यांतील व्यक्तिपरिचय अभ्यंकर कुलवृत्तांतात दिलेला आहे.