गावडे-आंबेरे घराणे रत्नागिरीपासून 26 कि.मी. वर रत्नागिरी-भडे या रस्त्यावर आणि पावस पासून 6 कि. मी. वर आहे. मावळंगे जवळील नदीला पावसात पूर येत असल्याकारणाने व नदीवर पुल नसल्याकारणाने बसने जाणारी वाहतूक पावसात काही काळ खंडित होते. गावडे आंबेरे या ठिकाणी 12 वाड्या असून एकूण लोकवस्ती 2000 चे आसपास आहे. पाटाच्या बाजूने काळथर दगडांनी सडक बांधलेली आहे. दोन्ही बाजूला घरे आहेत. हे गांव अंदाजे 1200 वर्षो पूर्वी वसविलेले आहे असे म्हणतात. या ठिकाणची प्राथमिक शाळा इ.स. 1875 साली स्थापन झाली व तिथून ती हल्लीच्या जागी इ.स. 1975 मध्ये बांधण्यात आली. पाटाच्या वरच्या बाजूस अभ्यंकरांची तीन घरे असून पाटाच्या खालच्या बाजूस विश्वेश्वर मंदिराजवळ तीन घरे आहेत. पैकी सध्या वास्तव्य फक्त एकाच घरात आहे. व्यवसाय मख्यत्वे शेती, बागायती व भिक्षुकी आहे. अभ्यंकर प्रमाणेच केळकर, फडके इ. ब्राह्मण कुटुंबे राहतात. कुर्धे या गावी ज्या वेळेस वस्ती अभ्यंकर-खोत यांनी केली, त्याच सुमारास गावडे-आंबेरे येथेही अभ्यंकर कुटुंबे रहावयास आली असावी असे दिसते. सध्या अस्तित्वात असलेली घरे व वास्तव्य करीत असलेल्यांची नावेपुढिलप्रमाणेः-
1) डॉ. भालचंद्र रामचंद्र अभ्यंकर पुणे यांची मातोश्री सीताबाई रामचंद्र अभ्यंकर, वय 80 2) जगन्नाथ सखाराम अभ्यंकर 3) महादेव गंगाधर अभ्यंकर 4) मधुसूदन दामोदर व दत्तात्रय अभ्यंकर यांचे घर-घरात वास्तव्य नाही. 5) शंकर गोविंद अभ्यंकर(कंत्राणे) उपाध्ये 6) शंकर अनंत अभ्यंकर-वास्तव्य- नाही-मृत 1987. 7) नरो बाबजी अभ्यंकर नगरकर यांचे घरात वस्ती नाही.
तथापि गावडे आंबेरे हे आपले मूळगांव आहे असे सांगून माहिती देणा-या बंधूंचे शक्यतो त्या त्या घराण्यात अंतर्भाव करुन वंशावळीतील बंधूंच्या स्थलांतरानुसार घराण्यांचे क्रमांक कुलवृतांतात दिले आहेत.
कुलधर्म व कुळाचार- गावडे आंबेरे येथील सर्व अभ्यंकर कुटुंबात गुहागरचा व्याडेश्वर कुलदेव व अंबेजोगाईची योगेश्वरी कुलदेवता मानतात. कुलधर्म म्हणून मार्गशीर्ष महिन्यात बोडण घालण्याची पद्धत आहे. नवरात्रांत देवीचा उत्सव असतो. महालक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. त्याशिवाय ग्रामदेवता म्हणून जाखाई, जुखाई व काशी विश्वेश्वराची पूजा करतात.