या घराण्याचे पूर्वीचे आडनांव महाबळ होते. ते अंगाने धडधाकट उंचपुरे, पेहेलवानासारखे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वाचे होते. परन्तु स्वभावाने नम्र, विनयशील वृत्तीचे असल्याने लोकांची त्यांच्याबद्दल वाटणारी भीती गेली व त्यांना अभ्यंकर असे संबोधू लागले. शेवटचे बाजीराव पेशवे यांचेकडे या घराण्यातील पुरुष कारकुनी करत. रिकामपणी त्यांना कापडाचे हत्तीकरण्याचा छंद होता. ही कला पाहून पेशवे प्रसन्न झाले व त्यांनी त्यांना सदाशिवपेठेत एक वाडा बक्षिस दिला. कालांतराने ते व त्यांचे पुत्र नोकरी निमित्त उत्तर प्रदेशात झांशीस गेले व तेथे त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली. त्यामुळे पुण्याचा संबंध तुटला. पुढे श्री गोपाळ गणेश अभ्यंकर हे बबिना स्टेशनचे स्टेशनमास्तर असताना कुणी वयस्क स्त्री पुण्याहून आली व पुण्याच्या सदाशिवपेठेतील घराचा हिस्सा नको असे त्यांच्याकडून लिहून मागितले. ते स्वभावातच निरिच्छ व विरक्त वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी तसे त्यावेळी लिहून दिले. त्यामुळे या घराण्याची मालमत्ता पुणे येथे शिल्लक राहिली नाही.