नारिंग्रे हे गांव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा) देवगड तालुक्यात देवगडपासून 18 कि.मी. अंतरावर आहे. देवगढ यास पूर्वी देवदुर्ग असे म्हणत. नारिंग्रे गावच्या चतुःसीमा-पुर्वेस कोटकामते व पोयरे गावची सीमा, दक्षिणेस हिंदळे गावची सीमा, पश्चिमेस बागमळा व पलिकडे-मिठबांव गावची सीमा व उत्तरेस दहीबाव गांवची सीमा अशी आहे. सन 1864-65 मध्ये या गावची सर्व्हे झाली होती व त्यानुसार खारेबंदी खोती अशी नोंद झाली आहे. या गावची लोकसंख्या गावाचे क्षेत्रफळाचे मानाने कमी म्हणजे 1600 एवढी आहे. या ठिकाणी अभ्यंकर कुटुंबियांची वस्ती 17 व्या शतकापासून असावी. इ.स. 1774 साली श्री. बाबाजी प्रल्हाद अभ्यंकर-महाजन यानी रु. 5 ते 6 हजार खर्च करुन श्री गांगेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पेशव्यांनी या गावातील श्री गांगेश्वरदेवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी काही रक्कम व जमीन दिल्याचा उल्लेख दप्तरी आहे. ह्या मंदिराचे उत्सव इत्यादि प्रसंगी पालखीचा व इतर मान अभ्यंकर कुटुंबियांकडे वंशपरंपरेने चालत आला आहे व त्यासाठी वतनही दिल्याची माहिती उपलब्ध आहे. अशा मानकरी अभ्यंकरांना महाजन हा किताब दिलेला होता, म्हणून त्यांचे घराण्यातिल सर्वांना लोक अभ्यंकर-महाजन म्हणून ओळखतात.
या गावी अभ्यंकर-महाजन, बापट-महाजन म्हणवून घेणारे, कुलकर्णी (शेणवी) बापट-उपाध्ये, खाडिलकर,गोरे, गद्रे, अभ्यंकर इ. व बापट आळीतील मराठे, रावराणे व घाडी इत्यादि रहातात. जुलै 1929 रोजी लिहून ठेवलेल्या डॉ.श्रीधर भिकाजी अभ्यंकर यांच्या टिपण वहीत याचा पुरावा उपलब्ध आहे. इतर कुटुंबियांना भिक्षुक अभ्यंकर असे म्हणतात. पेशव्यांचा नातेसंबंध आणि वरदहस्त असल्यामुळे नारिंग्रे येथील अभ्यंकरांना काही जमीन वतन म्हणून दिली. तसेच श्री गांगेश्वर मंदिरात मान मिळू लागला तरी नारिंग्रे येथील अभ्यंकरांनी 18 व्या व 19 व्या शतकांत चरितार्थासाठी महाराष्ट्रांत व महाराष्ट्राबाहेर निरनिराळ्या ठिकाणी स्थलांतर केले व त्या ठिकाणीच ते स्थायिक झाले. कालांतराने नारिंग्रे येथील मूळ घराण्याशी संबंध तुटला. नारिंग्रे हे मूळ गाव आहे असे सांगणा-या अनेक बंधूंकडून जी माहिती मिळाली त्यावरुन वंशावळी तयार केली आणि ती पूर्वीच्या डॉ. श्रीधर भिकाजी अभ्यंकर यांच्या वंशावळीतील व्यक्तींशी जोडण्याचा प्रयत्न केला. जुनी वंशावळी 14-15 पिढ्यांची माहिती देते. परन्तु त्यातील व्यक्तींचा परिचय लिहिलेला नाही किंवा उपलब्ध नाही. तथापि वहीतील त्रोटक टिपामुळे पुणे, इंदूर, व-हाड, धारवाड, कुंदगोळ, वकील इत्यादि त्रोटक माहितीच्या आधारे हल्लीच्या 4-5 पिढ्यतील वंशावळी जोडून ती अद्यावत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे व्यक्तिपरिचयात फक्त आजपासून मागील चार पाच पिढ्यातील व्यक्तींची माहिती दिली आहे.
नारिंग्रे येथे आज मितीस अभ्यंकर-महाजन यांचे कुणीही वंशज राहत नाहीत.
अभ्यंकर कुलवृत्तांतात कृष्णंभट उर्फ फटभट हा मुळपुरुष मानून त्याचे पाच मुलगे व पुढील वंशज यांची नावे दिली असली तरी कृष्णंभट उर्फ फटभटाच्या आधी आठ पिढ्यांची नावे डॉ. श्रीधर भिकाजी अभ्यंकर यांच्या टिपणवहीत दिलेली आहेत, ती खालीलप्रमाणे-
सध्या नारिंग्रे येथे अस्तित्वात असलेली घरे पुढिलप्रमाणे असून ती सर्व ज्योतिषी, भिक्षुक- अभ्यंकरांची आहेत.
1) श्री केशव(नाना) रामचंद्र अभ्यंकर
2) श्री दामोदर नारायण अभ्यंकर
3) श्री अनिरुद्ध मधुसूदन अभ्यंकर
4) श्री शंकर रधुनाथ अभ्यंकर
5) श्री श्रीपाद रामचंद्र अभ्यंकर