अभ्यंकर परिवाराचे शिल्पकार व कुलवृत्तांताचे जनक-श्री ज.द. अभ्यंकर, ठाणे

कै. श्री ज. द. उर्फ जनार्दन दत्तात्रय अभ्यंकर हे अभ्यंकर कुलवृत्तांताचे खरे जनक होय. याबद्दल सांगावयाचे म्हणजे श्री ज. द यांनी अभ्यंकर परिवाराच्या कुलवृत्तांतामधील मनोगतात जी माहिती दिली आहे त्या आधारे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश विदेशातील अभ्यंकर कुलबंधू-भगिनींना स्वतः त्यांच्या घरी भेट देऊन व पत्रव्यवहार करुन जी मोलाची माहिती मिळविली त्यामुळे अभ्यंकर कुलवृत्तांत प्रकाशित करुन व जतन करुन ठेवल्याने आज हा ग्रंथ म्हणजे ज. द यांनी दिलेला हा लाख मोलाचा ठेवाच आहे असे म्हण्टल्यास वावगे होणार नाही.

श्री ज. द. अभ्यंकर कुलवृत्तांताच्या मनोगतात लिहितात की सन् 1948 मधे त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिल्यावर मुंबईस पुढील शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आल्यानंतर ठाणे येथे एक दोन अभ्यंकर कुटुंबाची घरे पाहिली. त्यामुळे आपल्या प्रमाणे इतरत्र अभ्यंकर आडनावाचे बंधू असल्याबद्दल फारच आपुलकी वाटली. त्याच सुमारास म्हणजे 1948 ते 1955 याकाळात अनेक आडनावांच्या घराण्यांचे कुलवृत्तांत प्रसिद्ध होत होते. त्याची माहिती वर्तमानपत्रातून वाचण्यात येत असे. अभ्यंकर आडनावाचे लोक फारच तुरळक दिसत. त्यामुळे अभ्यंकर कुलाविषयी असलेली जिज्ञासा जागृत होऊन अभ्यंकर कुळातील व्यक्तींची माहिती देणारा असा एखादा कुलवृत्तांत तयार होईल असे त्यांना सारखे वाटत होते.

श्री ज. द.यांना सरकारी नोकरीत असताना किचकट आणि क्लिष्ट काम करण्यामधील अनुभव तसेच अनेक ठिकाणी असलेल्या ओळखी आणि काही थोर बंधूंच्या कर्तुत्वाबद्दल वाचनात आलेले लेख, पुस्तके इत्यादी मुळे कुलवृत्तांताचे काम आपणच का करु नये असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले.

श्री ज. द. अभ्यंकर पुण्यास गेले असता त्यांना असे कळले की पुणे येथील कै. नी. दा. अभ्यंकर यांनी चिंतामण लक्ष्मण नगरकर व त्रिपुरांतक विनायक अभ्यंकर या दोन व्यक्तींच्या साहाय्याने कुलवृत्तांताविषयी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न 1944-45 साली केला होता असे त्यांचे दिनांक 4/6/1944 चे विनंतीपत्रावरुन समजले. परंतु त्यावेळी फारच अल्प प्रतिसाद मिळाला आणि ते काम तसेच अपुरे राहिले. नंतर श्री ज. द.यांनी कुलवृत्तांत तयार करण्याचे काम हाती घेतले व 8 मार्च 1987 रोजी श्री ज. सी. अभ्यंकर यांचे घरी अभ्यंकर कुलवृत्तांतासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी ठाणे शहरातील 10-12 अभ्यंकर बंधुंनी सभा आयोजित केली व ठरल्यानुसार अभ्यंकर कुलवृत्तांत समिती स्थापन करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. रा. म. अभ्यंकर, खजिनदार म्हणून श्री ज. सी. अभ्यंकर व चिटणीस श्री ज. द.अभ्यंकर व सहचिटणीस म्हणून श्री अ.रा.अभ्यंकर यांची निवड करण्यात आली. दिनांक 30 मार्च 1987 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर अध्यक्षांच्या हस्ते माहिती गोळा करण्याविषयीच्या फॉर्म्सच्या वितरणास सुरुवात झाली.

श्री ज. द. आपल्या मनोगतात म्हणतात की सामाजिक कार्य करीत असताना नेहमी अनुभवास येणारी उदासीनता, विरोध आणि अडचणी लक्षात घेऊन हे कार्य त्यांनी 3-4 वर्षात पूर्ण करावयाचे ठरवले व निरनिराळ्या भागात राहत असलेल्या अभ्यंकर बंधूंशी संपर्क होईपर्येंत कुलबंधूंशी नियमितपणे संपर्क साधणे सुरु ठेवले. त्यामुळे व्यक्तिगत संपर्क, नवीन माहिती आणि नवीन कल्पना यांची भर पडत गेली. माहिती बरोबर आर्थिक साहाय्य ही मिळत गेले.

श्री ज.द.यांनी माहिती संकलित करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, अकोला, नाग़पूर, कुर्धे, मालगुंड, गावडे-अंबेरे, चिपळूण, रत्नागिरी, मालवण, आरोस, नाशिक, डहाणू, सासवणे, पनवेल, बडोदे इ. ठिकाणच्या जवळ-जवळ 250-300 कुटुंबांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तसेच त्यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांच्या चोपड्यातील लेख व माहिती उतरवून वंशावळीसाठी उपयोग केला.

अशा प्रकारे विविध त-हेने आणि विविध माध्यमातून माहिती जमवत असतानाच परस्पर परिचय वाढण्याच्या दृष्टीने समितीचा वर्धापन दिन साजरा करुन त्या जोडीला स्नेहसम्मेलन भरविण्याची कल्पना त्यांनी हिरिरीने मांडली. त्यास त्यांना सहका-यांचा आणि इतर परिचित बंधूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेनुसार त्यांनी ठाणे येथे तीन, पुणे येथे एक आणि बडोदे येथे एक अशी पाच सम्मेलने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडली. त्यांनी तीन स्नेहसंमेलन प्रसंगी प्रकाशित केलेली स्मरणिकाही अनेकांना आवडली व कार्यास उपयुक्त ठरली.

विद्यमान कार्यकारिणीने कै. श्री ज. द. यांचा वारसा पुढे नेत आत्तापर्यन्त अखंडपणे एकूण 20 वार्षिक स्नेहसंम्मेलने यशस्वीरीत्या पार पाडली आहेत व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा कार्यकारिणीचा मानस आहे.